आनंद येतो, वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो |

  मनामनावर जादू करतो, मनामनाला फुलवित येतो |

  कोकीळ कूजन मधुर ऐकू येते,आसमंत हा गुंगुन जाते |

  फुलाफुलातून साद उमलते,वसंत आला वसंत आला……।

  निसर्गाच सौदर्य बहरून येत तो ऋतू म्हणजे वसंतऋतू. ज्याला ऋतुराज म्हणून संबोधतात तो ऋतू म्हणजे वसंत. या ऋतूत वातावरण अगदी प्रसन्न झालेलं असतं. अश्यावेळी निसर्गाच्या सानिध्यात आपण गेल्यास आपणही आनंदी होत असतो. कोकिळेच मंजुळ गान ऐकू येत असते. नवनवीन सुहासिक फुले उमलतात तसेच आंब्याला मोहर सुद्धा याच ऋतूत येतो. हिवाळ्याची थंडी थोडी कमी झालेली असते आणि थोडी उब वातावरणात निर्माण झालेली असते. होळी, रंगपंचमी सारखे आनंददायी उत्सव/सण याच ऋतूत साजरे केले जातात. वसंत ऋतू आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आयुर्वेदानुसार कफ दोषाचा प्रकोप या ऋतूत होत असतो. पंचकर्माच्या दृष्टीने सुद्धा हा ऋतू फार महत्वाचा आहे. वाढलेला कफदोष काढून टाकण्यासाठी “वमन” हि शुद्धीक्रिया केली जाते.

जस निसर्गाचे सौदर्य वसंतात खुलते तसच मनुष्याच सौदर्य त्याच्या तारुण्यात प्रवेश केल्यावर खुलत असते. या तारुण्यरुपी वसंत ऋतूत अनेक सुंदर शारीरिक आणि मानसिक बदल मानवी शरीरात घडत असतात. जस आंब्याला मोहर या ऋतूत येतो तसच तारुण्यात स्त्री व पुरुष यांच्या मिलनातून नवीन जीवनाचा मोहर यावेळी फुलत असतो.

आजच्या घडीला संतती प्राप्तीसाठी अनेक जोडप्यांना खूप प्रयत्न करावे लागतात. खूप दवाखाने करावे लागतात. यातून शारीरिक, मानसिक व आर्थिक तिन्ही बाजूने दुख होत असते. ग्रॅजूएशन त्यानंतर पोस्ट ग्रॅजूएशन नंतर नौकरी, आईवडिलांपासून दूर राहायचे म्हणून स्वतःचे घर मग आर्थिक प्लानिंग अस करता करता आपण तिशी आरामात गाठतो. परंतु शारीरिक आणि मानसिक आणि भावनिक गरजांकडे लक्षच देत नाही. अजून सेटल झालो नाही बघू पुढे. हे लग्नाच्या बाबतीत आणि संततीच्या प्लानिंग बाबतीत आज फार घडते आहे. लग्न चुकून लवकर झाल तर संततीसाठी अजून ३-५ वर्षाचे प्लानिंग करण्यात येते. आपल्या कायद्याने ठरवून दिलेल्या वायोमर्यादेनुसारच विवाह झाला पाहिजे. यासाठी बालविवाहाची गरज नाहीच परंतु तिशी-चाळीशी पण गाठू नये आणि “तुला पाहते रे” ची वेळ येऊ देऊ नये.  

स्त्रियांचा कमी होत चाललेला रजनिवृत्तीचा काळ, तरुण मुलामुलींमध्ये कमी वयातच होणारे बिपी व डायबेटीज आणि थायरॉइड सारखे आजार, सारखे वाढणारे हार्मोनचे विकार आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे शिक्षण, नौकरी आणि सेटलमेंटच्या प्रवासात होणारे मानसिक ताण-तणावासारखे मानस विकार या सगळ्यांचा परिणाम प्रजनन संस्थेवर होताना आज दिसतो. या सगळ्यांसाठी आयुर्वेद आणि योग जीवनपद्धतीत अवलंबणे फार गरजेचे आहे.

कुठल्याही गोष्टींचा एक योग्य काळ/ऋतू असतो. तो चुकवला कि पुढे त्रास सुरु होतो. कारण वसंतऋतूनंतर पुढे ग्रीष्मऋतू म्हणजे उन्हाळा येतो. तसच तारुण्य निघून गेल्यावर वृद्धत्वाकडे वाटचाल सुरु होत असते. योग्य वयामध्ये लग्न होणे आणि संततीसाठी प्रयत्न करणे फार गरजेच आहे. प्लानिंगच्या आजच्या युगात सगळ्या गोष्टी प्लान करता येतात पण एकमेकांविषयीच प्रेम आणि उत्साह प्लान करता येत नाही. वसंत येतो आहे त्याचे स्वागत करा. कारण तारुण्य आणि फुल-फळ बहरतात, मोहरतात वसंतातच.

वैद्य भूषण मनोहर देव.

ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव

अधिकृत केशायुर्वेद उपकेंद्र,जळगाव व नागपूर 

www.jyotiayurved.com

7588010703/7972641552

 drbhushandeo@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *